भारत टी-20 वर्ल्डकप जिंकण्यापासून फक्त थोडाच दूर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 वर्ल्डकप 2022 चा दुसरा सेमीफायनलचा सामना गुरुवारी, 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर खेळला जाईल. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलच्या या सामन्यात भारतच जिंकेल असे मानला जात आहे.
या सामन्यात इंग्लंडचा पराभव करण्यात भारत यशस्वी ठरल्यास फायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल. भारतीय संघ आता ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता यावेळी टी-20 वर्ल्डकप 2022 चा चषक फार वेळ दूर राहणार नाही. असे झाल्यास भारत 15 वर्षांनंतर टी-20 वर्ल्डकप चषक जिंकेल. यापूर्वी 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक जिंकला होता.
भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. T20 बद्दल बोलायचे झाले तर, भारताचा इंग्लंडविरुद्धचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये आतापर्यंत 22 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 12 सामने भारताने जिंकले आहेत, तर 10 सामने इंग्लंड संघाने जिंकले आहेत.
T20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतने 2 सामने जिंकले आहेत तर इंग्लंड संघाने 1 सामना जिंकला आहे. 2012 साली भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्डकपचा शेवटचा सामना खेळला होता. 2012 मध्ये श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या T20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतने इंग्लंडचा 90 धावांनी पराभव केला होता.
2007 साली टिम इंडीया आणि इंग्लीश संघात T20 वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारताने 18 धावांनी विजय मिळवला होता. ज्यात भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते.
यावेळीही इंग्लंड संघाचा पराभव करून टी-20 विश्वचषकात अजून एक पाउल पुढे टाकण्यात टिम इंडीया यशस्वी होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.