PAK vs ENG T20 World Cup 2022 Final: ट्वेंटी वर्ल्डकपचा 2022 चा विजेता इंग्लंड ठरला आहे. रडत खडत फायनलमध्ये पोहोचलेल्या पाकीस्तानचा माज अखेर इंग्लंडनेच मोडला. आजची फायनल मॅच इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळली गेली. इंग्लंडने ही मॅच जिंकून २०२२ च्या ट्वेंटी वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले.
ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासात दुसऱ्यांदा ट्वेंटी वर्ल्डकप जिंकणारा इंग्लंड हा दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी 2010 मध्येही इंग्लंड चॅम्पियन बनले होते. वेस्ट इंडीजनेही दोन वेळा ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने पुन्हा एकदा तो संघासाठी मॅचविनर असल्याचे सिद्ध केले. बेन स्टोक्सने 49 चेंडूत नाबाद 52 धावांची धडाकेबाद खेळी केली. त्यात त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. बेन स्टोक्सशिवाय जोस बटलरने 26 धावांचे बहुमुल्य योगदान दिले. हॅरी चारिंग्टन ब्रूकही 23 चेंडूत केवळ 20 धावा केल्या. त्या देखील तितक्याच महत्वपुर्ण होत्या.
इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करन आणि लेग-स्पिनर आदिल रशीद यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर खूप दडपण आणलं. ट्वेंटी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ते 8 बाद 137 धावाच करू शकले. दुखापतीतून पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज सॅम करन इंग्लंडसाठी उत्कृष्ट गोलंदाज ठरला.
सॅम करनने चार षटकांत फक्त १२ धावा दिल्या. तसेच तीन बळीही घेतले. मोठ्या सामन्यात किती चांगली कामगिरी करू शकतो हे त्याने दाखवून दिले. त्याचवेळी आदिल रशीदही मागे राहिला नाही, त्याने मधल्या ओव्हर्समध्ये रन रेट नियंत्रित केला ज्यामध्ये त्याने आणि करनने मिळून 25 डॉट बॉल टाकले.
पाकीस्तानच्या कर्णधारने बाबर आझम 28 चेंडूत 32 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 14 चेंडूत 15 धावा केल्या. त्यांनी संथ सुरुवात केली. तेच पाकीस्तानसाठी घातक ठरले. त्याचवेळी मोहम्मद हारिस (12 चेंडूत आठ धावा) रशीदसमोर झुंजताना दिसला आणि त्याचा बळी ठरला.
शान मसूदने (28 चेंडूत 38) केल्या पण तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. या स्पर्धेत जबरदस्त खेळ दाखवणारा राव इफ्तिखार अहमद शुन्यावर बाद झाला. अष्टपैलू शादाब खानलाही 14 चेंडूत केवळ 20 धावा करता आल्या.
पाकीस्तान झुंज देत होता. इंग्लंडचे चार बळी घेत त्यांनी दडपणही आणले होते. पण बेन स्टोक्सने झंझावाती खेळी करत त्यांचे सगळे गणित बिघडवले. त्याने दडपणाखाली चांगला खेळ करत पाकीस्तानचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न उद्धवस्त केले.